विनायक खरात यांची संघर्षाकडून यशाकडे वाटचाल

कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली 
 श्री विनायक खरात यांचा संघर्षातून यशाकडे वाटचाल लोकसेवक न्यूज वृत्तसेवा

 तावशी (ता. इंदापूर) येथील श्री विनायक तुळशीराम खरात यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ते ‘विनायक कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून पुणे व परिसरात गेली १५ वर्षे यशस्वीपणे बांधकाम व्यवसाय करत असून शेकडो लोकांना रोजगार देत आहेत. वारकरी घराण्यातील संस्कार, मर्यादित शेती आणि मोठा परिवार यामुळे लहान वयातच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. गाईंची सेवा, शाळा आणि घरची कामे असा संघर्षमय दिनक्रम त्यांनी अनुभवला. आर्थिक अडचणी असूनही माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी जिद्दीने पूर्ण केली. फी भरण्याइतके पैसे नसतानाही परीक्षांना बसून त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. पदवीनंतर दोन हजार रुपयांच्या पगारावर साईट इंजिनिअर म्हणून काम करत अनुभव घेतला. मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पहिली इमारत यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ‘विनायक कन्स्ट्रक्शन’ला मोठी ओळख मिळाली. आज औद्योगिक शेड, व्यावसायिक व रहिवासी इमारतींच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय भरभराटीत आहे. वडिलांचे शेती वाढवण्याचे स्वप्न पूर्ण करत त्यांनी २५ एकर जमीन खरेदी केली. लहानपणी ज्या गाईंची सेवा केली, त्याच प्रेमातून आज ६० ते ७० गाईंचा डेअरी फार्म उभारला आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी गावात जलशुद्धीकरण प्लांट, पाणीपुरवठा योजना, कुपनलिका, गरिबांसाठी घरे अशा अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. संघर्षातून घडलेले श्री विनायक खरात आज युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असून “कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली” हे त्यांनी आपल्या आयुष्यातून सिद्ध केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post